लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वाढत्या काेराेनाच्या साथीला लगाम घालण्यासाठी मागील १० दिवसांपासून शासनामार्फत विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. यापूर्वी शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. तर आता संचारबंदी लावण्यात आली आहे. असे असतानाही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी सुमारे ४३४ बाधितांची भर पडली. आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. तर मृत्यूचे सत्रही सुरूच असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १४ हजार १९ झाली आहे. तर ११ हजार २४९ जणांनी काेराेनावर मात केली आहे. २ हजार ५८५ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण १८५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ११ नवीन मृत्यूंमध्ये गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा येथील ६४ वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील कारागोटा ५६ वर्षीय महिला, आरमोरी येथील ६७ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, धानोरातील ५२ वर्षीय पुरुष, चिमूर येथील ७२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ५० व ७५ वर्षीय दाेन पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, गडचिराेली शहरातील गोकूलनगर येथील ५६ वर्षीय महिला, भंडारा तालुक्यातील कुडेगाव येथील ८७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. काेराेनाची साथ वाढत असताना नागरिक मात्र बिनधास्त रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून येते.
विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहितजिलह्यात करोना विषाणूचे संशयबाधित रुग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यासाठी तसेच संशयबाधित लोकांचे विलगीकरण करण्यासाठी राखीव विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यात शासकीय मुलींची आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चामोर्शी यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश गडचिरोली : राज्यात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांच्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहेत. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.
लग्नसमारंभात गर्दी आढळल्यास गुन्हा नाेंदविणार
लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधू, त्यांचे आई-वडील, मंगल-कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हे नाेंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. तसेच गर्दीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
एप्रिलमधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कार्यक्रमातील गर्दी कमी करण्याबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.