गडचिरोली : जिल्ह्यातील रिक्त पदाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत असून रिक्त पदांमुळे शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात विविध विभागातील २ हजार ४१३ पदे रिक्त असून या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या विकासात खोळंबा निर्माण होत आहे. मात्र जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पदांचा भरणा करण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखला जातो. जिल्ह्यात रिक्त पदांमुळे विकास नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. जिल्ह्यात ७२ शासकीय कार्यालये सुरू आहेत. या कार्यालयातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील अनेक पदे रिक्त आहेत. विविध विभागात एकंदरीत २३ हजार ६२३ पदे मंजूर असून यापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आले आहेत. जून २०१४ अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार चारही श्रेणीतील २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांची टक्केवारी १०.२१ एवढी आहे. जिल्ह्यातील अ श्रेणीत ४९४ पदे मंजूर आहेत. यापैकी ३१८ पदे भरण्यात आली आहेत. तर १७६ पदे रिक्त आहेत. ब श्रेणीतील १०११ पदे मंजूर असून ८५५ पदे भरण्यात आली आहे. तर १५६ पदे रिक्त आहेत. क श्रेणीतील १९ हजार २०२ पदे मंजूर असून १६९० पदे रिक्त आहेत. ड श्रेणीतील २ हजार ९१६ पदांपैकी २ हजार ५२५ पदे भरण्यात आली आहेत तर ३९१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची आकडेवारी लक्षात घेता अ श्रेणीत अधिकारी वर्गाच्या मंजूर पदांपैकी ३५.६३ टक्के पदे रिक्त आहेत. महसूल विभाग, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख, पोलीस विभागात अनेक रिक्त पदांचा अनुशेष वाढतीवर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण ९७५ पदे मंजूर असून यापैकी ८५८ पदे भरण्यात आली आहेत. यापैकी ११२ पदे अजूनही रिक्त आहेत. यामध्ये अ श्रेणीतील १२, ब श्रेणीतील १०, क श्रेणीतील ९० आणि ड श्रेणीतील ५ पदांचा समावेश आहे. अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत जिल्हाभरात ३५८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १६४ पदे भरण्यात आली आहेत तर १९४ पदे रिक्त आहेत. यामध्ये ब श्रेणीतील ६, क श्रेणीतील ११५, ड श्रेणीतील २१ पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषद कार्यालयांतर्गत ४९४ पदे रिक्त आहेत. यामध्ये अ श्रेणीतील ७४, ब श्रेणीतील ३५, क श्रेणीतील ३६३, ड श्रेणीतील २२ पदांचा समावेश आहे. पोलीस विभागात १६३ पदे रिक्त असून यामध्ये अ श्रेणीतील १४, ब श्रेणीतील ९, क श्रेणीतील १३६, ड श्रेणीतील ४ पदांचा समावेश आहे. या सर्व विभागातील पदे भरण्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काही पदे पदोन्नतीने कार्यमुक्त करण्यात आल्याने रिक्त झाली आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात २०९ पदे रिक्त आहेत. यामध्ये अ श्रेणीतील १९, ब श्रेणीतील १२, क श्रेणीतील ११० आणि ड श्रेणीतील ६८ पदे रिक्त आहेत. यासह शासनाच्या विविध विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून योग्य ते निर्देश देण्यात येत नसल्याने गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष वाढत आहेत. (शहर प्रतिनिधी)
२ हजार ४०० कर्मचाऱ्यांची गरज
By admin | Updated: August 9, 2014 01:11 IST