इरूपगुट्टात चकमक : भूसुरूंग केले निकामी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत इरूपगुट्टा जंगल परिसरात ९ मे रोजी पोलीस व नक्षल यांच्यात चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून तीन क्लेमोरमाईन, पिट्टू, दैनंदिन वापराचे व नक्षल्यांचे लिखित साहित्य जप्त केले. कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत इरूपगुट्टा जंगल परिसरात विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनीही आत्मसंरक्षणार्थ प्रत्त्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी आपल्याकडील साहित्य घटनास्थळीच टाकून जंगलात पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता, तीन क्लेमोर माईन, पिट्टू व इतर नक्षल साहित्य आढळून आले. बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आढळून आलेले क्लेमोर माईन जागेवरच निकामी केले. नक्षल्यांविरूद्ध कोटमी पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.
नक्षल साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 01:59 IST