गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या हद्दीतील पाच नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी दिली. नव्या पाच राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मजबूत होणार आहे.केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गामध्ये सिरोंचा-कालेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६३ पर्यंतचा ७ किमीचा मार्ग, करंजी-वणी-घुग्घुस-चंद्रपूर-मूल-सावली-गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव ते छत्तीसगडच्या सीमेपर्यंत ८६ किमी अंतराचा मार्ग, साकोली-लाखांदूर-देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-रेपनपल्ली पासून सिरोंचापर्यंतचा २६९ किमीचा मार्ग, नागपूर-उमरेड-नागभिड-ब्रह्मपुरी ते आरमोरीपर्यंतचा साडेचार किमी अंतराचा मार्ग व निजामाबाद-मंचेरियल-सिरोंचा ते जगदलपूरपर्यंतचा ५७ किमीच्या मार्गाचा समावेश आहे. सदर मंजूर झालेले पाचही मार्गाची किंमत ३० हजार कोटी रूपयाच्या घरात आहे. केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर या पाचही मार्गाचे काम सुरू होणार, असेही खासदार अशोक नेते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचेही खासदार अशोक नेते यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. भारत खटी, श्रीकृष्ण कावणपुरे, सुधाकर येनगंधलवार, स्वप्नील वरघंटे, प्रकाश अर्जुनवार, संजय बारापात्रे, रेखा डोळस, प्रतिभा चौधरी, लता पुन्घाटे उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मजबूत होणार
By admin | Updated: December 7, 2014 22:50 IST