लिकेश अंबादे लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : येथील आठवडी बाजारात पंजाब राज्यात प्रसिध्द असलेल्या किनू संत्र्याची आवक झाली होती. जवळपास तीन आठवडे किनू संत्र्याचा बोलबाला होता. मात्र, नागपूरच्या संत्र्याची आवक वाढताच किनू संत्र्याच्या मागणीत घट झाली असून, दरही पडले आहेत.
शहरातील आठवडी बाजारात नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे ग्राहक पंजाबच्या किनू संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा खरेदी करताना दिसत आहेत. सध्या गुजरीमधील फळविक्रेत्यांकडे नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे संत्रा ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाजारात नागपूरच्या संत्र्याची आवक वाढली आहे. त्यामुळे संत्र्याच्या दरात घसरण झाले आहे. यासह येत्या संक्रात सणाला लागणारी सफरचंद, बोराची आवकही वाढली असून, सध्या ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे भाव आहे.
संत्रा हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी व अन्य पोषक तत्वे आहेत. त्यामुळे थंडीमध्ये नागरिकांनी याचे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निरोगी ठेवते. आपल्या बाजारपेठेत उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल महिन्यात पंजाबमधील किनू संत्रा बाजारपेठेमध्ये येतो. याचे दर सुरुवातीला १२० रुपये किलोप्रमाणे असतो, तर नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यातील नागपुरी संत्री बाजारात भरपूर येत असल्याने दर ६० रुपये किलोने विकली जाते. यामधील सर्वाधिक नागपुरी संत्र्याला ग्राहकांची पसंती अधिक मिळत आहे.
संत्रा ठरतो आरोग्यदायी संत्रा सेवनामुळे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे लघवीच व किडनीचा आजार बरे होतात. त्याचप्रमाणे हृदयरोग, कॅन्सर अशा आजारापासून दूर ठेवतो. शिवाय संत्राच्या सालीच बुकटी त्वचेसाठी फायदेशीर आहे. पोटात गॅस, उच्च रक्तदाब, स्नायूचे वेदना, जुलाब, गर्भवती महिला, यकृताचे रोगी यासाठी संत्रा आरोग्यदायी आहे.
बोरांची आवक सुरू मकर संक्रांतीला पूजेसाठी बोरांची आवश्यकता असते. सध्या बोरांचा हंगाम सुरू झाला असून आवक वाढली आहे. नागपूरसह गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून बोरे विक्रीसाठी कोरची व परिसरात येत आहेत. ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
"नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे संत्र्याचे दर कमी झाले आहेत. परंतु, ग्राहकांना उन्हाळ्यातील पंजाबमधील किनू संत्रापेक्षा नागपुरी संत्र्याला जास्त पसंती आहे. त्यामुळे ग्राहक नागपुरी संत्रा खरेदी करत आहेत." - फैजान सय्यद, फळ विक्रेते, कोरची
ग्राहक म्हणतात..."दरवर्षी नोव्हेंबरमध्ये निघणारा नागपुरी संत्रा मी खरेदी करते. या संत्र्याच्या सेवनामुळे निरोगी राहण्यास मदत होते तसेच संत्र्याच्या सालीपासून ते बियांपर्यंत अनेक फायदे आहेत." - सविता कावळे, ग्राहक, कोरची
"पंजाब किनू संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा आवडीचे आहे. त्यामुळे मी नागपुरी संत्रा घेते आणि आता बाजारामध्ये संत्र्याची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे." - रिया धुवारिया, ग्राहक, कोरची