लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील माल वाहतूकदारांना त्यांच्या वाहनांची ब्रेक तपासणी करून पासिंग करण्यासाठी आता नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय गाठावे लागणार आहे. गडचिरोली परिवहन कार्यालयाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून सदर टेस्ट नागपूर कार्यालयाच्या ट्रॅकवर घेण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी घेतला आहे.उच्च न्यायालयाच्या १८ फेब्रुवारी २०१६ व त्यानंतर वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे आवश्यक केले. १ नोव्हे्रंबर २०१७ पासून ही चाचणी कोणत्याही खासगी जागेत किंवा सार्वजनिक रस्त्यावर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला. सध्या राज्यातील ४० पैकी केवळ १४ ठिकाणीच असे ट्रॅक उपलब्ध आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून २६ ठिकाणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना त्यांच्या अधिनस्थ परिवहन वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठी नजिकच्या परिवहन कार्यालयातील शासकीय जमिनीवर बांधलेल्या ट्रॅकवर पाठवावे लागणार आहे.गडचिरोलीत ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधण्याकरिता ६२ लाख २२ हजार ५८९ रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी ४८ लाख ६० हजार ७७४ बांधकाम विभागाला अदाही करण्यात आले. त्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांनी ३० मे २०१७ रोजी वर्क आॅर्डर काढली. मात्र भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीच्या अध्यक्ष भाग्यश्री ऋतुराज हलगेकर यांनी सदर ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या बांधकामास तात्पुरता मनाई हुकूम मिळण्याकरिता गडचिरोलीच्या व्यवहार न्यायालयात अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने सदर बांधकामास स्थगिती दिली. त्यामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत ट्रॅकचे बांधकाम करणे शक्य झाले नाही.जिल्ह्यातील वाहतूकदारांनी त्यांची वाहने तपासणीसाठी १ नोव्हेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (ग्रामीण) येथे न्यावीत. तेथील ब्रेक चाचणीचा अहवाल नंतर गडचिरोली कार्यालयास सादर करावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फासे यांनी कळविले आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या वाहनधारकांना ३०० ते ४०० किलोमीटर अंतर पार करून नागपूरला या टेस्टसाठी जावे लागणार आहे.
जड वाहनांच्या पासिंगसाठी आता गाठावे लागेल नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:31 IST
जिल्ह्यातील माल वाहतूकदारांना त्यांच्या वाहनांची ब्रेक तपासणी करून पासिंग करण्यासाठी आता नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय गाठावे लागणार आहे.
जड वाहनांच्या पासिंगसाठी आता गाठावे लागेल नागपूर
ठळक मुद्देब्रेक टेस्ट ट्रॅकचा अभाव : न्यायालयाच्या आदेशाने थांबले बांधकाम