मॉडेल स्कूल बंद केल्याचे प्रकरण : शाळाही बंदच; विद्यार्थी आंदोलनात सहभागीधानोरा : धानोरा तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या विरोधात शुक्रवारी दिवसभर परिसरातील पालक व नागरिकांनी शाळेसमोर तीव्र आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच राहिले. मोहलीची शाळा कुलूपबंद करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मोहली गावाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शासनाने घेतलेला निर्णय १०-१२ दिवसात बदलविण्याचे प्रयत्न करण्यात येईल. १ जुलैला मुंबईला जाऊन हा प्रश्न आपण शासन दरबारी रेटू, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पं.स. सभापती कल्पना वड्डे, जि.प.सदस्य मनोहर पोरेटी, परसराम पदा आदीसह नागरिक उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या मोहली शिक्षण समितीचे अध्यक्ष रवींद्र पुंगाटे व हरिश्चंद्र सहारे यांच्याशी शिक्षणाधिकाऱ्यांनी उद्धट वागणूक केल्याची माहिती आमदारांना या दोघांनी दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी धानोराचे तहसीलदार फुलसंगे, संवर्ग विकास आधिकारी पांडुरंग कोल्हे, सहायक संवर्ग विकास आधिकारी फुलसंगे, नायब तहसीलदार मडावी हे आले होते. परंतु आंदोलन मागे घेणार नाही, असे आंदोलकांनी त्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशीही शनिवारी हे आंदोलन सुरूच होते. त्यामुळे शाळा उघडली नाही. यावेळी आंदोलनात नारायण मुनघाटे, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, सरपंच कुलपती मेश्राम, रघुनाथ बावणकर, जांगदाचे सरपंच मनसाराम मडावी, मोहलीच्या सरपंच भागरथा गावडे, उपसरपंच खुशाल पदा, दिनदयाल गुरूनुले, शांताराम पदा, सरस्वती नैताम, रवींद्र पुंघाटे, विजया हलामी आदी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी)
मोहलीत दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच
By admin | Updated: June 28, 2015 02:18 IST