महसूल कामकाज होणार ठप्प : विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना दिले निवेदनगडचिरोली/चामोर्शी/मुलचेरा : जिल्हाभरातील तलाठ्यांनी १२ एप्रिल रोजी लेखणीबंद आंदोलन पुकारले असून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फतीने राज्य शासनाला सादर केले. तलाठी साजाची पुनर्रचना करण्यात यावी, एनएलआरएमपीला सर्व सुविधांचा पुरवठा करावा, यासाठी येणारा इंटरनेटचा खर्च शासनाने करावा, लॅपटॉप, इंटरनेट, एडीटमोड पुरविण्यात यावे, गौण खनिजाच्या कामातून तलाठ्यांना वगळण्यात यावे, एनएलआरएमपीचे पायाभूत प्रशिक्षण सर्व तलाठ्यांना द्यावे, तलाठी कार्यालये आणि मंडळ अधिकारी कार्यालयात अद्ययावत सुविधा पुरविण्यात याव्या, पदोन्नतीने २५ टक्के जागा भरण्यात याव्या, त्रिसदस्य पद्धतीतून एक पद्धत बंद करावी, मंडळ अधिकारी यांना कार्यालयीन भाडे द्यावे, लॅपटॉप पुरविण्यात यावा आदी मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. चामोर्शी तालुक्यातील मंडळ अधिकारी तलाठी यांनी १२ एप्रिल रोजी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत चामोर्शीच्या तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही सादर केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डी. ए. ठाकरे, सरचिटणीस एस. पी. शिंदे यांच्यासह तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. मुलचेरा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ११ एप्रिलपासून महसुलाच्या व्यतिरिक्तची कामे बंद केली असून ते काळ्या फिती लावून आंदोलन करीत आहेत. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर दुपारी १ वाजता धरणे आंदोलन करणार आहेत. २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, २१ एप्रिल रोजी संगणकीकृत कामांवर बहिष्कार घातला जाईल, २६ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारले जाईल, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
तलाठ्यांचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: April 13, 2016 01:40 IST