गडचिरोली : ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना टंचाईग्रस्त गावे जाहीर करुन या गावांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने घेतला असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव ५० टक्क्याच्या आत पैसेवारी त दाखविण्यात आलेला नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावे ५० टक्क्याहून कमी पैसेवारी असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विशेष सवलतीपासून मुकण्याची वेळ आली आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला. सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. परिणामी येथील शेतकऱ्यांनी खरीप पीक घेतले नाही. या रबी हंगामातील पिकांचे सर्वेक्षण करुन पैसेवारी जाहीर करण्यात आली. कमी पैसेवारी असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, वीजबिलात ३३.५ टक्के सूट, दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे व टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, अशा आठ सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र यापैकी एकाही सवलतीचा लाभ गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांना मिळणार नाही. यंदाच्या रबी हंगामात इतर जिल्ह्यांप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडला. मात्र सर्वेक्षणाअंती गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दर्शविण्यात आली.राज्य शासनाने राज्यातील सहा प्रशासकीय विभागातील ३९२३ गावांची पैसेवारी जाहीर केली. त्यापैकी १२५३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर २६७० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दर्शविण्यात आली. औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यात ३५६ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्याचा क्रमांक लागला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३९३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यापैकी सर्वच ३९३ गावांची पैसेवारी ५० पैशांपैकी कमी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतींचा लाभ होणार आहे. जालना जिल्ह्यातील ४० पैकी ४० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ११० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. मात्र सर्वच ११० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यातील गावांची पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक
By admin | Updated: April 18, 2015 01:34 IST