जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : अल्पवयीन मुलीचा झाला होता विनयभंगगडचिरोली : १० वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बळजबरीने तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रूपये दंड ठोठावला. हरिदास किसन मडावी रा. हनुमान वॉर्ड गडचिरोली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान हरिदास किसन मडावी याने तिला चॉकलेट देतो, असे आमिष दाखवून तिचा बळजबरीने हात पकडून तिला घरात नेले. तिच्या तोंडाला रूमाल बांधून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पीडित अल्पवयीन मुलीचे वडील घरी आले. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पीडित मुलीच्या आईने या घटनेची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी आरोपी हरिदास मडावी याचेवर भादंविचे कलम ३४१, ३५४ व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वे गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी हरिदास मडावी याच्या विरोेधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. शुक्रवारी विशेष न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी सर्व साक्षीपुरावे तपासून दोन्ही बाजुच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून आरोपी हरिदास मडावी याला भादंविचे कलम ३४१ अन्वये सहा कैद व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याच्या कलमान्वये तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम प्रकाश गोरे यांनी केला. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शिंदे, हवालदार चौधरी, महेश आकुलवार, सोनिता तावाडे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
विनयभंग करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी
By admin | Updated: August 27, 2016 01:33 IST