दिगांबर जवादे - गडचिरोलीचूल आणि मूल सांभाळणे ही महिलेच्या आयुष्यभराची जबाबदारी मानल्या गेली होती. आजच्या प्रगत युगातही ७० टक्केपेक्षा अधिक महिलांचे बहुतांश आयुष्य हेच सांभाळण्यात जात आहे. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करतांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना निमोनिया, दमा, आंधळेपणा, फुफ्फुसाचा क र्करोग, टी.बी. हे आजार व कमी वजनाचे बाळ जन्माला येत होते. यावर उपाय म्हणून वनविभागाने गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ८५ हजार ५५० चुलींचे वाटप केले आहे. यामुळे महिलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात स्वयंपाकादरम्यान घरातील चुलीमुळे निघणाऱ्या प्रदूषणामुळे भारतातील प्रतिवर्षी ५ लाख स्त्रीया बाधीत होऊन मृत्यूमुखी पडतात. ७० टक्के नागरिकांच्या घरी खिडकी ठेवली नसते. त्यामुळे हा वायु बाहेर न पडता घरातच कोंडून राहतो. सरपण म्हणून गोवऱ्या, लाकूड, कोळसा आदींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यांच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड, बेन्झीन, फारमलडिहाईड, सुक्ष्म राख निघते यामुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना विविध प्रकारचे रोग होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार स्वयंपाक घरातील वायु प्रदूषण पातळीच्या मानकापेक्षा ३० पट अधिक घातक असल्याचे दिसून आले आहे. हे सर्व सत्य असले तरी आर्थिक परिस्थितीमुळे सरपणाचा वापर करून स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. हे त्याहूनही अधिक सत्य आहे. प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलींडर खरेदी करणे व त्याचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. हे लक्षात घेऊन गडचिरोली वनविभागाने २०१२-१३ मध्ये २९ गावांमध्ये ५५५ धुरविरहित चुलींचे वाटप केले. त्याला ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर महिलांचे आरोग्यही सुधारल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने २०१३-१४ या वर्षात सुमारे ८५ हजार धुरविरहित चुलींचे वाटप केले आहे. पारंपरिक चुल ज्या ठिकाणी आहे. त्या चुलीखाली २६ इंच लांब ६.५ इंच रूंद व ५ इंच मध्यभागी खोली व दोन्ही टोकाकडे निमुळती होणारी नाली खोदावी या नालीवर ८ इंच बाय ८ इंच लांबी- रूंदीची बीडची जाडी मध्यभागी अशा तऱ्हेने बसविण्यात यावे की, जेणेकरून जाडी जमिनीवर राहणार नाही. या जाडीवर पारंपरिक चुल ठेवावी, अशा पद्धतीने धुरविरहित चुल तयार होईल. या सुधारित चुलीतून लाकडास प्राणवायू मिळाल्याने कमीत-कमी लाकूड जळून जलतण धुररहित राहते. कमी इंधनात व कमी वेळात स्वयंपाक बनतो.
चूल तीच, धूर मात्र नाही
By admin | Updated: August 9, 2014 23:42 IST