चामोर्शी : मक्याच्या शेतात लपवून ठेवलेला १२ ड्रम मोहसडवा चामोर्शी पोलिसांनी पकडून नष्ट केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्या सडव्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शीपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा विष्णूपूर गावाच्या शेतशिवारात अवैधरित्या मोहफूल सडवा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चामोर्शी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून शोध घेतला. त्यात मक्याच्या शेतामध्ये व शेतातील एका छोट्याशा खोलीत लपवून ठेवलेला १२ ड्रम मोहफुल सडवा जप्त केला. आरोपी हे शेतशिवारात लावलेल्या मक्याच्या पिकाचा सहारा घेऊन अवैधरित्या मोहफूल सडव्यापासून मोहा दारू तयार करत होते.
याप्रकरणी विष्णूपूर येथील उज्वल मंडल व रवी मंडल यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील, पोलीस हवालदार जोगेश्वर वाकुडकर, नायक शिपाई विनोद कुनघाडकर, शिपाई विलास गुंडे, अनिल कोराम यांनी केली.