धान लागवड : दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी सरसावले धानोरा : तालुका कृषी अधिकारी धानोराच्या वतीने आत्मा अंतर्गत दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना यांत्रिकी पद्धतीने धान लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. याअंतर्गत जि. प. सदस्य केसरी उसेंडी यांच्या गट्टा येथील शेतात यांत्रिकी पद्धतीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक सोमवारी करण्यात आले. गट्टा गावात दंतेश्वरी शेतकरी गटांच्या पुढाकारातून धान लागवडीचे तीन प्रात्यक्षिक करण्यात आले. यांत्रिकी पद्धतीने धान लागवड केल्यास उत्पादन खर्च कमी येतो व उत्पादनात वाढ होते. या लागवडीच्या पद्धतीत जास्त मजुरांची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सदर पद्धत सोयीस्कर आहे. कृषी विभागाच्या वतीने धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागात यांत्रिकी पद्धतीच्या धान लागवडीसाठी प्रयत्न होत असल्याने दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता यांत्रिकी शेतीकडे वळणार असल्याचा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रात्यक्षिकेच्या वेळी तालुका कृषी अधिकारी वाय. एस. ठाकूर, मंडळ कृषी अधिकारी वाहणे, कृषी पर्यवेक्षक चलकलवार, कृषी सहायक क्षीरसागर, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, सरपंच विमल उसेंडी, शांताराम उसेंडी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
यांत्रिकी शेतीकडे वाढला कल
By admin | Updated: August 10, 2016 01:41 IST