गडचिरोली : मानव विकास अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्यावतीने ३७ शेतकरी गटांना ९० टक्के अनुदानावर कृषी यंत्र वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कृषी यंत्र वितरित करण्यात आले. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकरी गटांनी मोठी प्रगती साधली आहे. आता यांत्रिकी सेवा केंद्र स्थापन होणार आहे, अशी माहिती कृर्षी यांत्रिकीकरणाचे मुख्य संमन्वयक विजय कोळेकर यांनी केले. एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमांतर्गत येथील सोनापूर परिसरातील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आज शनिवारला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी विजय कोळेकर मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी आढावा बैठकीला कृषी आयुक्तालयाचे कृषी सहसंचालक डी. बी. देशमुख, कृषी उपसंचालक (यांत्रिकीकरण) डॉ. राम लोकरे, कृषी उपसंचालक (खते) राजेंद्र कवडे, मुख्य निरिक्षक किशोर डेरे आदी उपस्थित होते. माानव विकास मिशन अंतर्गत यंत्र मिळालेल्या ३७ शेतकरी गटांनी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करून कमी खर्चात अधिक उत्पादनाची शेती केली आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाद्वारे या शेतकरी गटांनी मोठी कृषी क्रांती केली आहे, असेही कोळेकर यावेळी म्हणाले. याप्रसंगी कृषी सहसंचालक देशमुख यांनी यांत्रिकी पध्दतीने भात लागवडीच्या योजनेस शेतकऱ्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच गडचिरोली येथे झालेले यांत्रिकीकरणाचे काम महाराष्ट्रात कुठेही झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे, असेही डॉ. लोकरे यावेळी म्हणाले. आढावा सभेला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कुडमलवार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, जि.प. कृषी विकास अधिकारी कापसे उपस्थित होते.
यांत्रिकी सेवा केंद्र स्थापन होणार
By admin | Updated: December 20, 2014 22:38 IST