गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नयेत आणि झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी ‘तंमुस’ची स्थापना करण्यात आली. ‘तंमुस’चा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी या समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.
जननी सुरक्षा कुचकामी
आलापल्ली : शासनाकडून जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. त्यामुळे ही याेजना कुचकामी ठरत आहे.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
देसाईगंज : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, या वीज चोरीचा भुर्दंड अन्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
एटापल्लीत किरकाेळ चाेऱ्यांचे प्रमाण वाढले
एटापल्ली : थंडीची चाहुल लागताच एटापल्लीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज लहान-लहान चोऱ्या हाेत आहेत. एटापल्ली येथील पंचायत समिती आवारातील बचतगट कार्यालयात वारंवार चाेरी हाेत असून, येथील गॅस सिलिंडर चाेरट्यांनी लपास केले आहेत.
पांढरे पट्टे विरहीत दिसतात गतिरोधक
आष्टी : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावेत, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र, बहुतांश गतिरोधकांवर हे पट्टे दिसत नाहीत. यामुळे अपघाताची शक्यता असून, अनेक अवजड वाहनेही या गतिरोधकांवरुन वेगाने जातात.
वयोवृद्धांना निवृत्तीवेतन द्या
चामोर्शी : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहिना तीन हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसहाय्य निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी मागणी होत आहे.
तलावात अतिक्रमण
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली असून, हे अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
माेकळ्या जागेवर कचरा
गडचिरोली : नगरपालिका क्षेत्रात अनेक प्रभागांमध्ये मोकळ्या जागा आहेत. मात्र, काही मोजक्याच मोकळ्या जागांना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या अशा जागांना संरक्षक भिंत नाही. त्यामुळे याठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाने अशा नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.
कुशल मजुरांचा तुटवडा
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या कुशल मजुरांची कमतरता जाणवत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे अप्रशिक्षित तरुणांच्या भरवशावर कामे करावी लागतात. त्यामुळे कामाचा दर्जा खालावतो.
अवजड वाहतूक जाेेमात
आलापल्ली : छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांनी वाहतूक केली जाते. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असून, अवजड वाहतुकीमुळे अपघात हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहतुकीवर कारवाई करण्याची गरज आहे.
कोरचीत मूलभूत समस्या
कोरची : तालुक्यात सिंचन, रस्ते, वीज, पाणी आदींसह अनेक समस्या ऐरणीवर आहेत. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तालुक्यात आरोग्याची समस्या गंभीर असून, तालुक्यातील विश्रामगृहाचीही दुरवस्था झाली आहे. शाळांच्याही समस्या कायम आहेत. या समस्या साेडविण्याची मागणी हाेत आहे.
सिरकाेंडाजवळ पूल बांधा
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पूल बांधणे गरजेचे असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अहेरीत वाढले अतिक्रमण
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यापूर्वीही अनेकदा हे अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई हाेत नाही.
बसथांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी व गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे गायब आहेत.
मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु, त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना सेवेचा लाभ मिळत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.