सिरोंचा : भारताच्या इतिहासात असंख्य वीर जवानांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले. काहींची नावे इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरली गेली, तर काही वीर शूरांची गाथा दुर्लक्षित राहिली. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गावचा सुपुत्र, शहीद जवान गोपाल बच्चय्या भिमनपल्लीवार हे असेच एक शौर्यशील नाव आहे, जे आज विस्मरणात गेले असले, तरी त्यांचे बलिदान अजरामर आहे.
गोपाल भिमनपल्लीवार यांचा जन्म १ जुलै १९३४ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या छोट्या गावात झाला. ते पद्मशाली समाजातील होते. त्यांच्या कुटुंबात दोन भाऊ – सोमय्या आणि वेंकटेश, आणि एक बहीण – अगम्मा होती.
शालेय शिक्षण त्यांनी जि.प. प्राथमिक शाळा, सिरोंचा येथे घेतले. १ एप्रिल १९४१ रोजी त्यांनी शाळेत प्रवेश घेतला आणि ३ जून १९४८ रोजी शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच त्यांच्यात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली होती.
गोपाल भिमनपल्लीवार यांनी २२ जानेवारी १९५८ रोजी मद्रास इंजिनिअर ग्रुप कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स या भारतीय सैन्याच्या नामांकित युनिटमध्ये भरती होऊन आपल्या सैनिकी जीवनाची सुरुवात केली. ही युनिट फील्ड इंजिनिअरिंग, पुल उभारणी, बारुद निकामी करणे अशा विविध तांत्रिक कामांसाठी प्रसिद्ध आहे.
त्यांच्या सेवेतील शिस्त, कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांना अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कठीण मोहिमा यशस्वी करण्यात आल्या.
१९७१ चे भारत-पाक युद्ध – अंतिम लढा
गोपाल भिमनपल्लीवार यांनी आपले अंतिम बलिदान १९७१ च्या भारत-पाक युद्धात दिले. हे युद्ध भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे युद्ध होते, ज्यातून बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली.१० डिसेंबर १९७१ रोजी, युद्धभूमीवर ते शौर्याने लढताना त्यांना वीरमरण आले. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती. त्या काळात भारताच्या लष्कराने आपली ताकद आणि कौशल्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. गोपाल भिमनपल्लीवार यांचाही या विजयात मोलाचा वाटा होता.
शहीद गोपाल यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्व. सम्मक्का गोपाल भिमनपल्लीवार, कन्या श्रीमती सावित्री, आणि मुले – स्व. बच्चय्या, श्री. सुरेश व श्री. रमेश हे आहेत. त्यांचे कुटुंब आजही गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा भागात राहते.
पण खेदाची गोष्ट अशी की, आजही हे कुटुंब आणि गावकरी त्यांच्या बलिदानाबाबत शासनाच्या कोणत्याही स्मृतीचिन्ह, सन्मान किंवा मदतीपासून वंचित आहेत. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या या सुपुत्राच्या कार्याला उचित सन्मान मिळणे आवश्यक आहे.
आज अनेक लहानशा गोष्टींना देखील प्रचार मिळतो, पुरस्कार दिले जातात, परंतु देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर शहीदांबाबत समाजाचे आणि शासनाचे दुर्लक्ष निश्चितच खेदजनक आहे.
गोपाल भिमनपल्लीवार यांच्यासारख्या शूर जवानांनी आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करून, त्यांच्या नावे शाळा, चौक, स्मारक किंवा रस्त्यांना नावे देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे.
गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने शहीद जवान गोपाल भिमनपल्लीवार यांच्या बलिदानाची दखल घ्यावी. त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीचा लाभ मिळावा, तसेच शहीद जवानांच्या नावे एखादे स्मारक उभारले जावे ही गावकऱ्यांची अपेक्षा आहे.