लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी नवीन आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये २८ जूनपासून बाजारपेठ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवा, कृषीविषयक दुकाने, संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. उर्वरित सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील. गडचिराेली जिल्हा सुरुवातीला श्रेणी-३ मध्ये हाेता. त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दिली हाेती. मात्र मागील आठवड्यात श्रेणी-१ मध्ये समावेश झाल्याने आठवड्यातील सर्वच दिवस दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली हाेती. मात्र डेल्टा या नवीन प्रकारातील काेराेना विषाणूचे राज्यात हाेत असलेले संक्रमण लक्षात घेऊन शासनाने १ व २ स्तर रद्द केले आहेत. या दाेन स्तरांतील जिल्ह्यांना तीन स्तरांवरील निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी रविवारी नवीन आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये २८ जूनपासून पुढील आदेशापर्यंत गडचिराेली जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवा, कृषीविषयक दुकाने, संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. उर्वरित सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील.
हाॅटेल्स साेमवार ते शुक्रवारच सुरू- रेस्टारंट, उपहारगृह हे साेमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. एकूण क्षमतेच्या ५० टक्केच डायनिंग व्यवस्था ठेवता येईल, इतर वेळेस पार्सल, हाेमडिलिवरी सुरू ठेवता येईल. - माॅल, सिनेमागृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंद राहतील
५ वाजतानंतर संचारबंदी- सायंकाळी ५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल. तसेच सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकत्रितरीत्या ५ पेक्षा अधिक लाेकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल. - शाळा, महाविद्यालये, काेचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती- शासकीय कार्यालये साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के असावी. त्याहून अधिक उपस्थिती गरजेची असल्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल.
सलून साेमवार ते शुक्रवार- व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. यासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. एससीचा वापर करता येणार नाही. - सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येईल. मात्र उभ्याने प्रवास करण्यास प्रतिबंध असेल.