खरेदीसाठी महिलांची गर्दी : तीळ ९० रूपये तर गूळ ४० ते ५० रूपये किलोगडचिरोली : मकरसंक्रांती हा महिलांसाठी आनंद, उत्साह व प्रेमाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण सण आहे. या सणातून आपापसात प्रेम व सलोखा वृध्दींगत होत असतो. मकर संक्रांतीनिमित्त गडचिरोली येथील रविवारचा बाजार वाण, तीळ-गूळ आदीसह विविध साहित्यांनी फुलला होता. मकर संक्रांतीनिमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी उसळली.गडचिरोली शहरातील त्रिमूर्ती चौकापासून आठवडी बाजारापर्यंत फुटपाथसह मोठी दुकाने तीळ-गूळ व वाणांनी सजली आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही विक्रेत्यांनी विविध प्रकारचे स्टिल व प्लास्टिकचे वाण महिलांसाठी ठेवलेले आहे. बहुतांश दुकानात रविवारी महिला मोठ्या संख्येने वाण खरेदी करताना दिसत होत्या. गतवर्षी स्टिल वाणाचे भाव प्रति किलो ३०० ते ३२५ रूपये होता. मात्र यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे आर्थिक चणचण भासत असल्याने वाणाच्या भावात घसरण झाली. रविवारच्या बाजारात स्टिल वाण प्रति किलो २५० ते २८० या भावाने विकले जात होते. गूळ ४० ते ५० रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर तीळ प्रति किलो ९० रूपये दुकानात विकला जात आहे. आठवडी बाजारात महिला व पुरूष विक्रेते ९० ते १०० रूपये पायली दराने तीळ विकत असल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिळाच्या भावातही घसरण आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीळ, गूळ व वाणाचे भाव घसरले आहेत. गतवर्षी गुळाचा ५० ते ६० रूपये किलो भाव होता. मकर संक्रांतीनिमित्त रविवारी गडचिरोलीच्या बाजारात परिसरातील महिलांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.मकरसंक्रांती १५ जानेवारी रोजी शुक्रवारला आहे. गडचिरोलीचा १० जानेवारी रविवारचा बाजार मकर संक्रातीचा पहिला बाजार पडला. त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील तसेच दूरवरून रविवारला या बाजारात ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने वाण व इतर खरेदीसाठी दाखल झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
मकर संक्रांतीनिमित्त बाजार फुलला
By admin | Updated: January 11, 2016 01:22 IST