चामोर्शी : मार्र्कंडेश्वर देवस्थानाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे. पर्यटन विभागाने मार्र्कंडा देवस्थान येथे ४ कोटी ९० लाख रूपयांची कामे मंजूर केली आहे, अशी माहिती मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, रामप्रसाद मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, अशोक तिवारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, खा. अशोक नेते व आ. डॉ. देवराव होळी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मार्र्कंड्याच्या विकासाची दारे मोकळी झाली आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून मार्र्कंड्यातील सर्व पोचमार्ग ,पिण्याच्या पाण्याची सुविधा, निरिक्षण मनोरा बांधकाम, सुलभ शौचालय, जाहिरात पोर्टल, गेट व सुरक्षा कक्ष, भूमीगत गटारे, फुटपाथ, पाण्यातील खेळ व नौकाविहार, इमारत बांधकाम, टॅक्सी चौकी सुविधा आदी विकास कामे करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
मार्कंड्यात ४ कोटी ९० लाखांची विकासकामे होणार
By admin | Updated: March 28, 2016 01:37 IST