गडचिरोली पोलीस ठाण्याच्या गणरायाला निरोप : पोलीस व कुटुंबीय डीजेच्या तालावर मनसोक्त नाचलेगडचिरोली : गडचिरोली पोलीस ठाण्यातील गणरायाला बंदोबस्ताच्या तणावमुक्तीनंतर शुक्रवारी अतिशय उत्साहात पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार निरोप दिला.गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणाला लागून पोलीस वसाहत आहे. या वसाहतीत श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. पोलिसांचे कुटुंब या गणेशोत्सवात मागील दहा दिवस उत्साहाने सहभागी झाले होते. घरातील पोलीस कर्मचारी सार्वजनिक गणेश मंडळांचा दहा दिवस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त सांभाळत असताना प्रचंड तणावात होता. गडचिरोली शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी गुरूवारी गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला. रात्री एक ते दीड वाजेपर्यंत हे विसर्जन चालले. पोलीस वसाहतीत असलेल्या या गणरायाला शुक्रवारी पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार निरोप दिला. जवळजवळ दुपारनंतर गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात डीजे लावून पोलीस कर्मचारी व त्याचे कुटुंबिय मनमुराद नाचले. त्यानंतर सजविलेल्या ट्रकवर सायंकाळी गणरायाला ठेवून गडचिरोली शहराच्या चंद्रपूर मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही पोलीस कर्मचाऱ्यांनी ढोलताशाच्या निनादात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबही डीजेच्या तालावर मनमुराद नाचले. गडचिरोली शहराच्या तलावात पोलिसांच्या या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक व इतर सर्व पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते. पोलीस विभागाचा गणपती विसर्जनासाठी नेण्यात येत असलेल्या वाहनाला फुलांची सजविले होते व गणराया विराजमान असलेल्या आसनाच्या पाठीमागे गर्दीत रूग्णवाहिकेला अवश्य जागा करून द्या, असा संदेश देणारा फलक लावण्यात आला होता. याशिवाय बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या महत्त्वाच्या विषयावरही जनजागृती करणारे फलक या वाहनावर ठेवण्यात आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)
बंदोबस्ताच्या तणावमुक्तीनंतर मनमुराद आनंद लुटला
By admin | Updated: September 17, 2016 01:45 IST