गडचिरोली : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती लागवडीसाठी खर्च कमी येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन कमी खर्चाची व शाश्वत शेती करून उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी जागतिक मृदा आरोग्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत कुत्तरमारे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, उपसभापती किशोर गद्देवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, कृषी विकास अधिकारी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने पाणी, खताचे नियोजन त्याकरिता आवश्यक असणाऱ्या निविष्ठा कृषी विभागामार्फत उपलब्ध व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर कृषी अधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा पुरविण्याचे आश्वासन देऊन शेतीबाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे सूचित केले. तालुका कृषी अधिकारी आय. एन. शेख यांनी प्रास्ताविकातून सन २०१५- १६ मध्ये गडचिरोली तालुक्यातील १२८ गावांपैकी ४३ गावांमध्ये नमूने तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. सदर निवड केलेल्या गावाच्या क्षेत्रातून १ हजार ५०५ नमूने लक्षांक प्राप्त झाले असून यापैकी ९१० नमूने तपासण्यात आले व संबंधित लाभार्थ्यांना आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येत आहे, असे सांगितले. यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी ए. एन. डोंगरवार, कृषी पर्यवेक्षक दिहारे, बळवाईक यांनी सहकार्य केले.
कमी खर्चाची शाश्वत शेती करा
By admin | Updated: December 9, 2015 02:01 IST