मुख्यमंत्र्यांना निवेदन : जि.प. पदाधिकारी भेटलेगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विशेष योजनांवर निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गडचिरोली जिल्हा रस्ते, कृषी, सिंचन या क्षेत्रात मागे राहिला आहे. वनकायदा तसेच विविध योजनांवर मिळणारा अपुरा निधी, कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदे यामुळे विकासावर मोठा परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहे. तसेच सिंचन प्रकल्पही मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याला निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील पर्यटनस्थळाचा शेगावच्या आनंदसागर प्रकल्पाच्या धर्तीवर विकास करण्यात यावा, राज्यपालांची ९ जून २०१४ ची पेसा अधिसूचना रद्द करण्यात यावी, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जाती यांचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, जिल्ह्यातील १६४५ मामा तलाव दुरूस्ती व बारमाही पाणीसाठा उपलब्ध राहण्यासाठी याला फिशटँकचे स्वरूप देण्याकरीता तीन वर्षात ५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास प्रत्येक तलावात २० लाखापर्यंत मत्स्य व्यवसाय होऊन यातून जिल्हा परिषद, ग्रामपंचायती व गावांचाही विकास निधीच्या माध्यमातून होऊ शकतो. या कामासाठी राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही जि.प. पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वैनगंगा नदीवर गणपूर, आष्टी येथे बॅरेजेस बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच चिचडोह, भेंडाळा, नेताजीनगर, आष्टी, वाकडी, शांतीग्राम, टिकेपल्ली, मुलचेरा, रेगुंठा, भामरागड या उपसा सिंचन योजनांकरीता निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आहे.
विशेष योजनांचा निधी उपलब्ध करून द्या
By admin | Updated: November 25, 2014 22:56 IST