लाेकमत न्यूज नेटवर्ककाेरेगाव/चाेप : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने काेरेगाव व चाेप परिसरात सुमारे २५ एकर क्षेत्रावर यावर्षी रब्बी हंगामात माेहरी पिकाची लागवड केली जाणार आहे. अखिल भारतीय समन्वयीत मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूरमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहरी पीक प्रात्यक्षिकातील लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम कोरेगाव येथे आयोजित केले होते.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप कामडी (मोहरी पैदासकार) कृषी महाविद्यालय नागपूर व डॉ. दीक्षा ताजने (विद्यावेत्ता) कृषी महाविद्यालय नागपूर, भूषण देशमुख, तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम, कृषी पर्यवेक्षक सी. जी. ताडपल्लीवार, काेरेगावचे उपसरपंच अनिल मस्के, पाेलीस पाटील शामराव उईके यांच्यासह कोरेगाव व चाेप येथील शेतकरी बांधव हजर होते.रबी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे व जास्त फायद्याचे पीक आहे. मोहरी पिकाला १० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत या पिकाची लागवड झाल्यास कमीत कमी पाण्यात पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळते. मोहरीमध्ये जवळपास ४० टक्के तेल असल्याने खाद्यतेलाची गरज भागविता येणार आहे. मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकविण्याकरिता व चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड टाकली जाते. या पिकाला ५०५० रु. प्रति क्विंटलप्रमाणे आधारभूत किंमत मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी केले. संचालन कृषी सहायक योगेश बोरकर, आभार कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृषीमित्रांनी सहकार्य केले.
अशी करा पिकाची लागवडडॉ. ताजने यांनी मोहरी पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. या पिकासाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असून ३ पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी यांनी मोहरी पिकाची लागवड पद्धत व एकात्मिक पीक व्यवस्थापनाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. योग्यवेळी पेरणी व झाडांची संख्या मर्यादित (६० ते ७० हजार प्रति एकर) ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या पिकास वन्यप्राण्यांचा त्रास कमी प्रमाणात होतो. पेरणी करताना १ किलो बियाणांस १.५ किलो रेती, माती मिसळावे, पिकास एकाच पाण्याची सोय असल्यास फुलोरा अवस्थेत द्यावे. पेरणीपूर्वी बियाणांस प्रति किलो ३ ग्रॅम थायरम लावावे. बियाणांची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.