गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकराच्या नावाने सातत्याने जप करणार्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधार्यासह सनदी अधिकार्यांचे पुरोगामित्वाचे ढोल वाजविणार्या तमाम सामाजिक, राजकीय, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील समाजसुधारकांचे बुरखे फाडणारी घटना नगर जिल्ह्यात घडली. यामुळे महाराष्ट्र कलंकित झाला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य प्रकाश ताकसांडे यांनी केली आहे.ताकसांडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक मंत्री नगर जिल्ह्यातून आहेत. सामाजिक नेतृत्व असलेल्या नगरसारख्या अतिप्रगत जिल्ह्यात नितीन आगे या दलित तरूणाची हत्या व्हावी, ही निंदनीय घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. २१ व्या शतकातही मनुवादी, ब्राह्मणवादी विचारांची विकलांग मानसिकता स्पष्ट करणारी घटना आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आर्थिक क्रांती करणार्यांचे हे अपयश असून या घटनेची जबाबदारी स्विकारून एकाही मानवतावादी राज्यकर्ता व सनदी अधिकारी तसेच समाजसेवक याने आपल्या पदाचा त्याग न करणे हे राज्यकर्त्याची सत्तालोलुपता मानसिकता दर्शविणारी आहे.महाराष्ट्रात अंधo्रद्धा निर्मूलन समितीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर आता नितीन आगे या तरूणाची हत्या झाली. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार व आसामसारख्या राज्याच्या रांगेत जावून बसला आहे. जातीय धार्मिकतेच्या आधारावर येथे समाजात तेढ निर्माण केले जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलावीत व सामाजिक न्यायमंत्री म्हणून तसेच अनुसूचित जाती, जमाती आयोगावर दलित व्यक्तीचीच राज्य शासनाने नेमणूक करावी, अशी मागणी ही ताकसांडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदनही पाठविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आगेच्या हत्येने महाराष्ट्र कलंकित झाला
By admin | Updated: May 10, 2014 02:33 IST