गडचिरोली : तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतच्या सरपंचपदी काही दिवसांपूर्वीच विराजमान झालेल्या जयश्री दीपक कन्नाके यांना शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे पद गमवावे लागले. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले.
पुलखल ग्रामपंचायतवर भाजपप्रणित गटाने सत्ता स्थापन केली होती. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्य सावित्री तुकाराम गेडाम यांनी सरपंच जयश्री कन्नाके यांचे पती दीपक कन्नाके यांचे राहते घर शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधले असल्याने त्याबाबत चौकशी करून त्यांना सदस्य पदावरून अनर्ह करावे अशी तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गडचिरोली तहसीलदारांमार्फत संबंधित अतिक्रमणाची शहानिशा केली. त्यानंतर सरपंच जयश्री कन्नाके यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधीही दिली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाचा दाखला देत जिल्हाधिकारी सिंगला यांनी कन्नाके यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर कार्यरत राहण्यासाठी अनर्ह करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला. या प्रकरणामुळे अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.