मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपत्ती कमविणे, ती वाढविणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. पण त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे असते. विद्यमान खासदार तथा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांनी अशाच गुंतवणुकीतून आपल्या संपत्तीत ५ वर्षात चार पटीने वाढ केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या संपत्तीत केवळ १० लाखांची वाढ झाली आहे, पण पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी तब्बल ७६ लाखांच्या कर्जाची परतफेड करून आपल्यावरील कर्जाचा डोंगर हलका केला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते आणि डॉ.नामदेव उसेंडी हेच दोन प्रतिस्पर्धी होते. यावेळी पुन्हा तेच आमनेसामने लढणार आहेत. त्यामुळे पाच वर्षानंतर पुन्हा दोन्ही उमेदवारांची तुलना सुरू झाली आहे. डॉ.उसेंडी यांना एक वेळ आमदारकी तर नेते यांना आमदारकीसोबत खासदारकीची संधी मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची काम करण्याची पद्धत, वागणूक यासोबतच संपत्तीचीही तुलना होऊ लागली आहे.दोन्ही उमेदवारांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी दाखविलेले संपत्तीचे विवरण आणि २०१९ मधील संपत्तीच्या विवरणाची तुलना केल्यास खा.नेते यांच्या चल-अचल संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. यातील बरीच वाढ ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केल्याने नाही तर आहे त्या संपत्तीचे बाजारमूल्य वाढल्यामुळे झालेली आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी डॉ.उसेंडी यांची एकूण संपत्ती नेते यांच्या संपत्तीपेक्षा जास्त होती. आता नेतेंची संपत्ती त्यांच्यापेक्षा जास्त झाली आहे.नेतेंच्या कर्जात ९८ लाखांची भर२०१४ मध्ये खा.अशोक नेते यांची चल संपत्ती ३९ लाख ८ हजार २६ रुपये होती, तर अचल संपत्तीची किंमत ७५ लाख होती. त्यांच्या एकूण संपत्तीची किंमत १ कोटी १४ लाख ८ हजार रुपये होती. त्यावेळी त्यांच्यावर ५८ लाख ३० हजार ५५० रुपये कर्ज होते. आता त्यांची चल संपत्ती ६९ लाख ९१ हजार ४७२ रुपयांची तर अचल संपत्ती ४ कोटी ६ लाख ६१ हजार रुपयांची झाली आहे. मात्र त्यांच्यावरील कर्ज पाच वर्षात ९८ लाखांनी वाढून ते आता १ कोटी ५६ लाख ८२ हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यात मुख्यत: घराच्या बांधकामासाठीच्या कर्जाचा समावेश आहे.उसेंडींवर १७.७३ लाखांचे कर्ज२०१४ मध्ये डॉ.नामदेव उसेंडी यांच्याकडे ५५ लाख १४ हजार ९११ रुपयांची चल संपत्ती तर ७१ लाख १५ हजार रुपयांची अचल अशी एकूण १ कोटी २६ लाख २९ हजार रुपयांची संपत्ती होती. त्यावेळी त्यांच्यावर ९३ लाख ८२ हजार ७९९ रुपयांचे कर्ज होते. आता त्यांची चल संपत्ती कमी होऊन ती ४६ लाख ८१ हजार ५२७ वर आली आहे. अचल संपत्तीत मात्र वाढ झाली असून ती ८९ लाख ९२ हजार ५७५ रुपये झाली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्यावरील कर्जापैकी ७६ लाख ९ हजार रुपये फेडल्याने त्यांच्यावरील कर्जाचा भार बराच हलका होऊन तो १७ लाख ७३ हजारावर आला आहे.
Lok Sabha Election 2019; पाच वर्षात खासदारांच्या संपत्तीत चौपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:28 IST
संपत्ती कमविणे, ती वाढविणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. पण त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे असते. विद्यमान खासदार तथा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांनी अशाच गुंतवणुकीतून आपल्या संपत्तीत ५ वर्षात चार पटीने वाढ केली आहे.
Lok Sabha Election 2019; पाच वर्षात खासदारांच्या संपत्तीत चौपट वाढ
ठळक मुद्देउसेंडींनी फेडले ७६ लाखांचे कर्ज : नेतेंच्या अंगावर १.५६ कोटींच्या कर्जाचा डोंगर