घोट : घोट परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा यावा, या हेतूने शासनाने घोटनजीकच्या रेगडी येथे सिंचन प्रकल्प उभारला. मात्र कालव्याच्या समस्येमुळे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील १४ गावे पाणीपुरवठ्यापासून वंचित राहतात. या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. अखेर बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी रेगडी जलाशय गाठून थेट जलकुंभाला कुलूप ठोकले.प्रशासनाने तत्काळ कालव्याची दुरूस्ती करून १४ गावातील शेतीला सिंचन सुविधेची सोय करावी, अन्यथा रेगडी जलाशयाच्या जलकुंभास कुलूप ठोकू, असा इशारा उपस्थित १४ गावातील शेतकऱ्यांनी यावेळी दिला. सिंचन सुविधा कायमस्वरूपी मार्गी न लागल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनात रेगडीचे सरपंच बाजीराव गावडे, चापलवाडाचे सरपंच प्रभाकर चौधरी, माडेआमगावचे मन्चू पुंगाटी, वरूरचे उपसरपंच सुनिल बट्टलवार, रघुनाथ कोवासे, उमाजी कुद्रपवार, रमेश दयालवार, नानाजी पदा, दीपक दुधबावरे, वसंत आत्राम, गोपीनाथ बक्कावार, केशव खोब्रागडे, गणेश कांदो, बंडू बारसागडे, सुनिल नेवारे, विवेक वैरागडे, मंगला चिताडे, अनिल दुधबळे, विलास ठाकूर, प्रभाकर माधावार, गुरूदास पालकंवार, गिरमा मोहदा, संजय दुधबावरे आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
रेगडी प्रकल्पाच्या जलकुंभास ठोकले कुलूप
By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST