सिरोंचा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना सिरोंचा तालुक्यातील रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. संपूर्ण सिरोंचा तालुक्यातील कोविड रुग्णांची ने-आण करण्यासाठी एकमेव रूग्णवाहिका उपलब्ध असल्याने वेळेवर रुग्णाजवळ पोहोचणे आरोग्य यंत्रणेला कठीण होत आहे.
सिरोंचाच्या ग्रामीण रूग्णालयात रुग्णांना तातडीने दाखल करण्यासाठी अधिक रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारने जिल्ह्यामध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेताना गरज भासल्यास खासगी वाहन पुरवठादारांची वाहनेदेखील रुग्णवाहिका म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून दक्षिणेकडे पातागुडम ७० किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वेला झिंगानूर ८० किलोमीटरवर, उत्तरेला रेगुंठा ८० किलोमीटर अंतरावर आहे. कोविड रुग्णांना आणण्यासाठी एकच रुग्णवाहिका असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. एखाद्या रुग्णाला जिल्हा मुख्यालयी कोविड रुग्णालयात दाखल करायचे असेल, तर २२० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. अशावेळी तालुक्यातील कोविड रुग्णाला ती रुग्णवाहिका येईपर्यंत प्रतीक्षा करणे किंवा स्वतःच्या वाहनातून येणे अनिवार्य झाले आहे. परंतु, खासगी वाहन नसलेल्या गरीब रुग्णांसाठी मात्र प्रतीक्षा करणे हाच पर्याय असल्याने रुग्णाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन सिरोंचा तालुक्याचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन कोविड रुग्णांकरिता वाहने वाढवून देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.