अहेरी तालुका न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण : भूषण गवई यांचे आश्वासनअहेरी : अहेरी उपविभाची भौगोलिक परिस्थिती, नागरिकांची आर्थिक परिस्थिती व जनतेच्या मागणीचा विचार करून येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांनी दिले.अहेरी येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या तालुका दिवाणी व फौजदारी (क स्तर) न्यायालय इमारतच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. आर. शिरासाव होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख, अहेरी तालुका बार असोसिएशनचे सचिव आर. एम. मेंगनवार, माजी न्यायमूर्ती कुबडे, चंद्रपुरच्या औद्योगिक न्यायालयाचे न्यायमूर्ती शेदानी, गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश दुनेदार, न्यायाधीश वाघमारे, मुख्य न्याय दंडाधिकारी जगदाळे, न्यायाधिश रेहपाळे, न्यायाधिश आबाजी, चामोर्शीचे न्यायाधिश पाटील, सिरोंचाचे न्यायाधिश पाटील अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, उपसरपंच पेदापल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अहेरीचे अंतर मोठे आहे. त्यामुळे अहेरी उपविभागातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. जलदगतीने न्यायदानाची व्यवस्था करण्यासाठी अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय होणे गरजेचे आहे. या न्यायालयाच्या निर्मितीसाठी आपल्या स्तरावरून कारवाई सुरू आहे. अहेरीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय निर्माण होण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व गडचिरोली बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही न्यायमूर्ती गवई यांनी केले. यावेळी गडचिरोली बार असोसिएशनचे अॅड. राम मेश्राम, अॅड. प्रमोद बोरावार, अॅड. शांताराम उंदीरवाडे, अॅड. कुनघाडकर, अॅड. श्रीकांत धागमवार, अहेरी बार असोसिएशनच्या अॅड. प्रीती डंबोळे, अॅड. सतीश जैनवार, अॅड. ममता बंदेला, अॅड. ज्योती ढोके, अॅड. संघरत्न कुंभारे, अॅड. उज्ज्वला राऊत, सरकारी वकील एस. के. पारधी, तहसीलदार कुनारपवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. मेंगनवार, संचालन अॅड. उदयप्रकाश गलबले यांनी केले. तर आभार अहेरीच्या तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिश डी. जे. कडस्कार यांनी मानले. कार्यक्रमाला अहेरी उपविभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)पूरक कारागृह आवश्यकअहेरी येथे दिवाणी व फौजदारी (क स्तर) न्यायालयाचे तीन मजली प्रशस्त इमारत उभी झाली आहे. जनतेच्या मागणीची दखल घेऊन या इमारतीत पुरक कारागृहाची व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करू असे न्यायमूर्ती गवई म्हणाले.
अतिरिक्त जिल्हा न्यायालय निर्मितीसाठी प्रयत्न करू
By admin | Updated: April 4, 2015 00:52 IST