वैरागड : जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असेल, अशांना तडीपार करण्याची कारवाई जिल्हा पोलीस प्रशासन करेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे तुकाराम विद्यालयाच्या प्रांगणात महिला व्यसनमुक्ती तथा दारूबंदी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट होते. उद्घाटन प्राचार्य पी. आर. आकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग, शुभदा देशमुख, जि. प. सदस्य सविता वाटगुरे, पं. स. सदस्य कविता दडमल, महादेव नाकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, पोलीस निरिक्षक अनिल पाटील, सरपंच चंद्रकांत चौके, उपसरपंच दमयंती सहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण आकरे, गजानन कुमरे, फाल्गुण नारनवरे, दत्तात्रय क्षिरसागर, नुसाराम कोटांगले, टिकाराम मांदाळे, भाग्यवान टेकाम उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, दारूचे गुन्हे असणाऱ्या लोकांवर गुन्हा सिद्ध होण्यासाठी विलंब होतो, तेव्हा पोलिसांनी पकडलेली दारू तपासणीसाठी जिल्ह्यात फिरत्या वैज्ञानिक प्रयोग शाळेची सुविधा निर्माण केली जाणार असून गावातील महिला अवैध दारू पकडून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवतील. त्यांना जाण्या-येण्याच्या खर्चाची तरतूदही केली जाणार आहे. दारू पकडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार दखल घेत नसतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कट्रोल रूममवर संपर्क करा, अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कढोली आणि परिसरातील दारूबंदी समितीच्या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आपल्या समस्या सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत चौके यांनी केले. संचालन प्रा. प्रदीप बोडणे यांनी केले. (वार्ताहर)दारूबंदीसाठी पोलिसांवर निर्भर राहू नका- राणी बंग४या कार्यक्रमात बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या की, समाजात वाईट व्यसनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात समाजाची विनाशाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केवळ पोलीस दारूबंदी करतील, यावर निर्भर न राहता, दारूबंदीसाठी महिला व पुरूषांनी पुढे येऊन गावाची वाईट गोष्टींपासून सोडवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.व्यसनमुक्ती मेळाव्याला मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मंचावर पी. आर. आकरे, डॉ. राणी बंग, जीवन नाट, अभिजीत फस्के.
पाचपेक्षा अधिक गुन्ह्यांत अडकलेल्यांना तडीपार करू
By admin | Updated: January 29, 2016 04:29 IST