पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : मेक इन गडचिरोलीचा वर्षपूर्ती सोहळागडचिरोली : आपला गडचिरोली जिल्हा वनसंपदा, खनिज संपत्ती, जल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीने ओतप्रोत भरलेला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३४ वर्षानंतरही जिल्हा विकासापासून कोसोदूर आहे. नोकरी मिळविण्याचा अट्टाहास न करता, विपूल नैसर्गिक साधनसंपत्तीतून रोजगार निर्मितीसोबतच जिल्हा विकास करू या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.गतवर्षी २६ आॅगस्ट २०१५ रोजी जिल्हा वर्धापन दिनाच्या पर्वावर मेक इन गडचिरोली या विकासात्मक संकल्पपूर्तीचा शुभारंभ आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. या संकल्पनेचा वर्षपूर्ती सोहळा शुक्रवारी येथील क्रीडा प्रबोधिनीत आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री आत्राम बोलत होते.कार्यक्रमाध्यक्ष अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, प्रतिभा चौधरी, स्वप्नील वरघंटे, डॉ. मुनघाटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले की, मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून मागील वर्षभरात केलेले उपक्रम, त्यातील उपलब्धी व या पुढील वर्षाच्या उपक्रमाचे स्वरूप या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणा सर्वापर्यंत पोहोचविण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील वनौषधीचा वापर करून ग्रामीण भागात वैदूंकडून आरोग्यबाबत औषधोपचार केला जात होता. मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून वैदूंना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन आरोग्य वातावरण व औषधी यातील साधर्म्य ओळखून तज्ज्ञ डॉक्टरांनी वैदूंना प्रशिक्षीत केले. आरोग्यसेवेसाठी उत्तम डॉक्टर उपलब्ध करून वैदूंना सदर कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशाच प्रकारे येथील उपलब्ध असलेल्या खनिजावर आधारीत उद्योग सुरू झाल्यास जवळपास १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या दृष्टीकोणातून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्याचे काम कंपनीमार्फत प्रगतीपथावर सुरू आहे. येथे येणाऱ्या कंपनीचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे, असे पालकमंत्री आत्राम यावेळी म्हणाले. संचालन रमेश भुरसे यांनी केले. (प्रतिनिधी)
नैसर्गिक साधनसंपत्तीतून रोजगार निर्मिती करू या
By admin | Updated: August 27, 2016 01:19 IST