मूग पिकावरील महिला शेतीशा शेतीशाळा उपक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गिलगाव येथे १६ मार्च राेजी शेतकरी सूरजागडे यांच्या शेतात शेतीशाळा आयोजित करण्यात आली. शेतकऱ्यांनी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा अतिरेक वापर न करता, जैविक साधनांचा उपयोग करून जास्तीतजास्त व विषमुक्त उत्पादन घ्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी म्हणाले, दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक घटकांच्या वापर वाढला आहे. त्यामुळे जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. जमिनीमध्ये उपलब्ध असलेले सेंद्रीय कर्ब, तसेच इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत आहे. जमिनीमध्ये विघटन न होणाऱ्या क्षारांचे प्रमाण वाढले आहे. पर्यायाने जमिनी कडक होऊन नापीक होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील दुष्परिणामांना सामोरे जायचे नसल्यास सेंद्रीय शेती हा एकच पर्याय आहे. पुढील पिढीला रोगमुक्त व सुदृढ बनविण्यासाठी त्यांना विषमुक्त अन्न उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे.
मूग पीक काढणीपश्चात तंत्रज्ञान या विषयावर कृषी सहायक किशोर भैसारे यांनी मार्गदर्शन केले. मुगाची साठवणूक करणे महत्त्वाची जबाबदारी आहे. गोणीत साठवणूक करावी, कीड नियंत्रक पावडरचा वापर कीड लागू नये म्हणून करावा, तसेच साठवणूक करताना थप्पीची संख्या मर्यादित लावावी. भिंतीला खेटून थप्पी लावू नये. बाजारात विक्रीकरिता माल नेत असताना स्वच्छ व गुणवत्तायुक्त माल न्यावा, असे मार्गदर्शन भैसारे यांनी केले. सुषमा सातपुते यांनी बीज प्रक्रिया व ५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धती सांगितली. दरम्यान, सांघिक खेळ खेळण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कृषी सहायक किशोर भैसारे यांनी मानले. यशस्वितेसाठी रवी चापुलवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.