ंएक शेळी ठार, तीन शेळ्या जखमी : आश्रमशाळा महिला कर्मचाऱ्यावरही हल्लारांगी : धानोरा तालुक्यातील रांगी व सोडे परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बिबट्याने रांगी येथील एक शेळी ठार तर तीन शेळ्या जखमी केल्याची घटना उजेडात आली आहे.रांगी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा परिसरात बिबट्याची गेल्या चार दिवसांपासून दहशत सुरू आहे. रांगी येथे शासकीय आश्रमशाळेला लागून जंगल आहे. गेल्या चार दिवसांपासून बिबट रात्रीच्या सुमारास आश्रमशाळेत फिरत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना आढळून आले. या आश्रमशाळेत ३०० विद्यार्थी शिकत असून २५ कर्मचारी निवासी राहतात. बिबट्याने रात्रीच्या सुमारास आश्रमशाळेतील एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून किरकोळ जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. रांगीलगतच्या ताडामटोला येथील कालिदास मडावी यांच्या घरालगतच्या गोठ्यात शिरून रात्रीच्या सुमारास बिबट्याने एक शेळी ठार केली. तसेच तीन शेळ्यांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले. त्यानंतर येथील रामलाल उसेंडी यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती आहे. बिबट्याच्या धुमाकुळामुळे रांगी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
रांगी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Updated: July 26, 2015 02:46 IST