प्रशासनाप्रती रोष : पोलीस ठाण्याच्या आवारातच नेत्यांना केले स्थानबद्धगडचिरोली : शेतकरी, शेतमजूर व भूमिहीनांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय आदिवासी महासंघ, भारत जनआंदोलन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी व भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने बुधवारी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारून शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. संतप्त मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच सरकारविरोधी घोषणा देत प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध केला.संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज व वीज बिल माफ करावे, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व निराधारांना ५ हजार रुपये मासिक पेंशन द्यावे, जबरानजोतधारकांना जमिनीच्या पट्टयांचे वाटप करावे, सहकारी सोसायटयांमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेल्या ठेवी व्याजासह परत कराव्यात, धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव द्यावा, शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहण मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. त्यासाठी हजारो कार्यकर्ते बुधवारी गडचिरोलीत दाखल होत असताना प्रशासनाने ३७ कलम जारी करून मोर्चाला परवानगी नाकारल्याचे आयोजकांना सांगितले व मोर्चेकऱ्यांना ठिकठिकाणी अडवून ठेवले. त्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भारत जनआंदोलनाचे नेते माजी आमदार हिरामण वरखडे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, महेश राऊत, प्रभू राजगडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, विनोद झोडगे, अॅड. जगदीश मेश्राम, हरिपाल खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, विशाल दाम्पल्लीवार, बारसिंगे आदींना पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध केले. त्यानंतर पोलीस ठाण्यातच सरकारविरोधी घोषणा दिल्या. हे सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबित असून, शेतकरीविरोधी आहे, अशी टीका यावेळी आयोजक नेत्यांनी केली. काही वेळानंतर पोलिसांनी सर्व नेत्यांना अटक केली. तर दुसरीकडे धानोरा व आरमोरी मार्गावरही पोलिसांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवले होते. यामुळे बराच वेळपर्यंत वातावरण तंग झाले होते.सायंकाळी उशिरापर्यंत अटक करण्यात आलेल्या मोर्चेकरी नेत्यांची सुटका करण्यात आलेली नव्हती. पोलीस ठाण्याच्या परिसरातही मोठा बंदोबस्त रात्री उशिरापर्यंत ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहराला बुधवारी कर्फ्युसदृश परिस्थितीचे रूप आले होते. याच दरम्यान गणेश विसर्जनही पार पडले. (स्थानिक प्रतिनिधी)पोलीस ठाण्यापासून धानोरा मार्गापर्यंत तगडा बंदोबस्तकिसान सभा, अखिल भारतीय महासभा, भारत जनआंदोलन, भाकपा, भारिप बमसं यांच्या वतीने बुधवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली होती. मात्र या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न होणार आहे, हे लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरून पोलीस ठाण्यापासून इंदिरा गांधी चौक ते धानोरा मार्गावरील पत्रकार भवनापर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मार्गावर अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी तसेच पोलीस वाहनही तैनात होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दिवसभर गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक विजय पुराणिक सर्व बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवून होते. शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी तहसीलदार व पोलीस विभागाकडे रितसर अर्ज करून परवानगी मागितली होती. तहसीलदारांनी १८ सप्टेंबरला मोर्चाची परवानगी दिली होती. मात्र १३७ कलम व गणेशोत्सवाचे कारण पुढे करून मंगळवारी सायंकाळला पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली. मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकरांना दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच नेत्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांपुढे आम्ही मांडणार होतो. मात्र पोलिसांनी मोर्चा काढू न दिल्याने लोकशाहीच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे कृत्य निंदणीय आहे. या कृत्याचा पक्षाच्या वतीने निषेध करतो.- डॉ. महेश कोपुलवार, जिल्हा सचिव,भारतीय कम्युनिस्ट पार्टी, गडचिरोली
डाव्या पक्षांचा मोर्चा दडपला
By admin | Updated: September 24, 2015 01:43 IST