अशोक नेते यांचे प्रतिपादन : केंद्र सरकारने महिलांना दिला सन्मानवैरागड : दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील महिलांना मानाचे स्थान मिळावे याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली व यातून महिलांना सन्मान मिळवून दिला. ज्या देशात महिलांना सन्मान मिळतो, तो देश सर्व आघाड्यावर यशस्वी होते, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील श्री तुकाराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात रूक्मणी एचपी गॅस ग्रामीण वितरक यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, सरपंच चंद्रकांत चौके, प्राचार्य पी. आर. आकरे, नाना नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.कंपनीचे विभागीय अधिकारी महेश रामजी यांनी प्रास्ताविकातून ५ कोटी लाभार्थ्यांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे सांगितले. सदर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत या योजनेतील लाभार्थ्यांना काही अपघात झाल्या एक लाखापर्यंत विमा काढता येणार आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात ४३ टक्के कुटुंबांकडे गॅस कनेक्शन आहेत. येत्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबांकडे गॅस कनेक्शन पोेहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आशिष कुमार यांनी केले. यशस्वीतेसाठी मनीष समर्थ, श्रीरंग धकाते, प्रदीप हजारे, वंदना बागडे व रूक्मणी गॅस एजन्सी कढोली यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
कढोलीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ
By admin | Updated: October 17, 2016 02:03 IST