सर्वसामान्यांत असंतोष : केरोसीनचा कोटा निम्म्यापेक्षा कमीदेसाईगंज : शासनाकडून सर्वसामान्यांना वर्षाला १२ सिलिंडर अनुदानातून मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सिलिंडरधारकांचे नाव केरोसीनच्या यादीतून वगळले आहे. मागील महिन्यापासून जे कुटुंब अनुदानित गॅसधारक आहेत, त्यांना रॉकेल मिळणार नाही, अशा प्रकारच्या आदेशाचे पत्र तहसीलदारांना प्राप्त झाले आहे. यामुळे आता केरोसीनच्या यादीतून सिलिंडरधारक बाद होणार आहेत. ग्रामीण भागाची जनता घरी सिलिंडर असतानासुध्दा जंगलातून मिळणाऱ्या सरपणाचा वापर अधिक करते. मात्र ज्यांच्याकडे सिलिंडर नाही, त्यांना मिळणारा कोटा देखील फारच कमी करण्यात आला आहे. शासनाच्या या केरोसीन विरोधीधोरणाचा सर्वत्र विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या नव्या आदेशामुळे जंगलातील सरपणाची चोरी अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २००१ पर्यंत केरोसीनचे वाटप ग्रामीण व शहरी भागात सारख्या प्रमाणात होत होते. परंतु केरोसीनचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने शहरी भागापेक्षा ग्रामीण लोकांना केरोसीनची अधिक गरज असल्याचे ओळखून तसा निर्णय दिला. ३१ मार्च २००१ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण व शहरी भागात केरोसीन वाटपाचे प्रमाण अधोरेखीत केले आहे. (वार्ताहर)
सिलिंडरधारक केरोसीनच्या यादीतून बाद
By admin | Updated: October 5, 2015 01:51 IST