वन्य प्राण्यांचे हल्ले : चार वर्षात नऊ लोकांचा मृत्यूदिगांबर जवादे गडचिरोली७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील चार वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ लोकांचा जीव गेला. तर ७९२ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र या सर्व बळींना केवळ तुटपूंजी मदत वनविभागाकडून देण्यात आली आहे, असाच प्रकार वन्य जीवांकडून शेतीच्या नुकसानीबाबतच्याही प्रकरणात झालेला आहे. जिल्ह्यात अर्ध्यापेक्षा अधिक गावे जंगलांनी व्यापली आहेत. या गावांमधील नागरिकांना दरवर्षीच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतोे. कधी वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान केले जाते तर कधी गाय, बैल, म्हैस, बकरी यासारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जातात. तर कधी प्रत्यक्ष नागरिकालाच वन्यप्राण्यांचा बळी बनण्याची वेळ येते. वन्यप्राणी ही वनविभागाची अमूल्य संपत्ती आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांकडून करण्यात आलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारीही वनविभागाचीच आहे. वन्यप्राण्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर शेतातील पीक फस्त केल्या जाते. वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून मदत मिळते. याची माहिती बहुतांश शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकरी याबद्दलची तक्रार वनविभागाकडे करीत नाही. एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर त्याचे प्रकरण मंजूर होऊन त्याला मदत मिळेलच याचीही शाश्वती राहत नाही. त्यामुळेच नुकसानभरपाई मिळण्याचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. वन्यजीवांकडून पिकांचे नुकसान झाल्याचे २०१०-११ मध्ये १९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्याअंतर्गत ६० हजार ४२० रूपयाची नुकसान भरपाई देण्यात आली. २०११-१२ मध्ये २९ प्रकरणे मंजूर झाली. त्याअंतर्गत १ लाख ३२ हजार २५० रूपये, २०१२-१३ मध्ये ८४ प्रकरणांना ३ लाख ५१ हजार २३० तर २०१३-१४ या वर्षात ३७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यांना १ लाख ४९ हजार ६६९ रूपयाची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत देण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप होत आहे.गावातील नागरिकांची गुरे जंगलात चरण्यासाठी जातात. या जनावरांवर वाघ, बिबट आदी हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ले केले जातात. एक बैलजोडी किमान ३० हजार रूपयाशिवाय मिळत नाही. पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना मृत्यूमुखी पाडल्यासही देण्यात येणारी मदत अत्यंत कमी आहे. २०१०-११ मध्ये २२६ पाळीव प्राणी बिबट व वाघाकडून फस्त करण्यात आले. या प्राण्यांच्या मालकांना १३ लाख ८२ हजार १५३ रूपयाची मदत देण्यात आली. २०१०-११ या वर्षात २२ नागरिक जखमी झाले. त्यांना ५ लाख ४० हजार ७०१ रूपयाची मदत देण्यात आली. २०१२-१३ मध्ये ५० जखमी नागरिकांना २० लाख ५८ हजार ९२३ तर २०१३-१४ मध्ये जखमी झालेल्या ३६ नागरिकांना १७ लाख ६४ हजार ६०४ रूपयाची मदत देण्यात आली. २०१० ते २०१४ या कालावधीत ९ नागरिक हिंस्त्र प्राण्यांचे शिकार बनले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे १८ लाख रूपयाची मदत देण्यात आली आहे.