भामरागड : अतिदुर्गम, नक्षलप्रभावीत लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या मे महिन्यापासून औषधीचा साठा उपलब्ध नाही. तसेच या ठिकाणी औषध निर्माण अधिकारीही नाही. यामुळे या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाहेरी परिसरातील नागरिकांनी केला आहे.लाहेरी हे भामरागड तालुक्यातील आदिवासी बहूल, अतिदुर्गम गाव आहे. या परिसरातील नागरिकांना आरोग्याची सेवा मिळावी यासाठी शासन व प्रशासनाच्यावतीने १९९२ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची लाहेरी येथे निर्मिती केली. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ आरोग्य उपकेंद्र येतात. लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ४३ गावांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या अनेक उपकेंद्रांमध्ये नर्स व इतर आरोग्य कर्मचारी नाही. फोदेवाडा, बिनागुंडा, गोगवाडा या ठिकाणीही आरोग्याची समस्या नर्स व आरोग्य कर्मचारी कार्यरत नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसाठी धडपड करावी लागते. या समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा लक्ष्मीकांत बोगामी, सरपंच सुरेश सिडाम यांनी दिला आहे.
लाहेरी आरोग्य केंद्रात औषधसाठ्याचा अभाव
By admin | Updated: August 10, 2014 22:59 IST