गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुमरगुडा ग्रामस्थांनी माओवाद्यांना न जुमानता मुख्य प्रवाहात येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत सर्वानुमते माओवाद्यांना गावबंदीचा ठराव मंजूर करून त्याची प्रत ८ सप्टेंबर रोजी भामरागड पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास साधण्यासाठी गावकऱ्यांनी माओवाद्यांविरोधात हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावातून कायमचे हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे.
या निर्णयानुसार गावकरी माओवादी संघटनांना पाठिंबा देणार नाहीत, त्यांच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, तसेच जंगल परिसरात त्यांना आसरा देणार नाहीत, असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले. या ठरावावर सुमारे ४० ते ४५ ग्रामस्थांची उपस्थिती होती.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक अमर मोहिते व भामरागड ठाण्याचे ठाणेदार दीपक डोंब यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
माओवाद्यांना धक्का
पूर्वी माओवादी प्रभावाखाली असलेल्या या गावाने घेतलेला ठराव माओवादी संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.२०२३ पासून सुरू असलेल्या नक्षल गावबंदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक गावांनी माओवाद्यांना नकार दिला आहे. कुमरगुडाचा निर्णय या साखळीतला नवा दुवा ठरला आहे.