कुरखेडा : घरकुल बांधकाम करण्याकरिता शासकीय राॅयल्टीसह वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर काेणतीही कारवाई न करणे व पुढे सुरळीत वाहतूक सुरू ठेवण्याकरिता २५ हजारांची लाच मागितली. त्यानंतर तडजाेडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना काेहकाच्या वनपालास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई २४ जानेवारी राेजी करण्यात आली.
नरेंद्र सीताराम ताेकलवार (५७) असे अटक झालेल्या वनपालाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्याकडे ट्रॅक्टर असून ते घरकूल बांधकामाकरिता शासकीय रॉयल्टीसह रेती वाहतूक करीत असताना आरोपी नरेंद्र ताेकलवार याने तक्रारदाराचे ट्रॅक्टर पकडून त्यांच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला व पुढे सुरळीतपणे रेती वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चालू देण्याकरिता २५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी गडचिराेली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर पाेलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढाेले यांच्या पर्यवेक्षणात पाेलिस निरीक्षक शिवाजी राठाेड व त्यांच्या टीमने तक्रारीची अत्यंत गाेपनीय पडताळणी करून सापळा रचला व २४ जानेवारी राेेजी पुराडा येथील वन परिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात वनपाल नरेंद्र ताेकलवार याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी ताेकलवार याच्यावर कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक शिवाजी राठोड, संतोष पाटील, तसेच चमूने केली. काेरची तालुक्यातील काेहका उपक्षेत्र पुराडा वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत येते, तर पुराडा हे गाव कुरखेडा तालुक्यांतर्गत आहे.
वसाहतीतील खाेलीसह चंद्रपुरातील घराची झडतीनरेंद्र ताेकलवार यांच्या पुराडा येथील शासकीय वसाहतील घराची गडचिराेली एसीबी तर चंद्रपूर येथील तुकूम वाॅर्डात असलेल्या घराची चंद्रपूर एसीबीकडून झडती घेण्यात आलेली आहे.