गडचिरोली : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून खासगी शाळांमधील शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतून २५ ते ५० टक्के शिक्षकांना प्रगणक म्हणून नेमण्यात आले आहे. सदर काम जवळपास एक महिना चालणार आहे. या काळात शिक्षण हक्क कायद्याचा बट्ट्याबोळ होणार असून बालकांना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवल्या जाऊ शकते. सध्या सरल डाटा बेसमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. सदर काम शिक्षकांनाच करावे लागत आहे. शिवाय आगामी परीक्षांसाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे शिक्षकांची द्विधा मन:स्थिती झाली आहे. याच कालावधीत नोंदवही अद्यावत करण्यासाठी प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवणी अद्ययावत करण्याच्या कामासाठी शिक्षकांची नेमणूक करू नये, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागाच्या वतीने प्रा. शेषराव येलेकर, हेमराज उरकुडे, पी. पी. म्हस्के, कमलाकर रडके, श्याम भर्रे, रामराज करकाडे, डी. जे. उरकुडे, स्मिता लडके यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नोंदवही अद्ययावत कामापासून शिक्षकांना दूर ठेवा
By admin | Updated: October 11, 2015 02:37 IST