सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायतीचे अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय नवसमाज दलाचे अध्यक्ष विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिरोंचा हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील तालुक्याचे मुख्यालय आहे. सिरोंचा विधानसभा क्षेत्राचे नावही अहेरी करण्यात आले व सिरोंचावर अन्याय झाला. १९४७ पासून सिरोंचा मतदार संघाचे आमदार व गडचिरोली लोकसभेचे खासदार हे खुल्या प्रवर्गासाठी नसल्याने या समाजाला संधी मिळालेली नाही. सिरोंचा क्षेत्राचा ९० टक्के लोकसंख्या खुला प्रवर्ग व ओबीसींची आहे. सिरोंचा क्षेत्रात केवळ १० टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. सिरोंचा शहरामध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण शेकडा १ टक्केपेक्षा कमी आहे. मात्र या शहराचे प्रमुख पद गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींकरिता राखीव आहे. हे आश्चर्यकारक आहे. आदिवासींसाठी राखीव असलेले शहराचे प्रमुख पद हे कुठल्याही तरतुदींना अनुसरून नाही. खुला प्रवर्ग व ओबीसींना न्याय मिळण्यासाठी सिरोंचा नगर पंचायती निवडणुकीमध्ये नगरसेवकांचे पद १०० टक्के खुल्या प्रवर्गासाठी देण्यात यावे, अशी मागणी कासर्लावार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
नगर पंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी ठेवा
By admin | Updated: May 15, 2015 01:29 IST