गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघाचा दुसरा खासदार होण्याचा मान कुणाला मिळतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. १0 एप्रिल रोजी १६ व्या लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर १६ मे रोजी मतमोजणी होऊ घातली आहे. गेले सव्वा महिने विजयाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर आता निकालाचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजुने दिला हे मतमोजणीतून स्पष्ट होऊन जाईल. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात ११ उमेदवार आपले भाग्य अजमाविण्यासाठी उभे होते. या मतदार संघात ६८.३३ टक्के मतदान झाले. त्यानंतर आता मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सकाळी ८ वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी आमगाव, आरमोरी, अहेरी, चिमूर या विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी १२ टेबल व गडचिरोली, ब्रम्हपुरी या विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी १४ टेबल असे एकूण ७६ टेबल राहणार आहे. ७६ टेबलावर सरासरी २६ फेरीपर्यंत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ५६0 अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या दुसर्या माळ्यावर आमगाव, आरमोरी, अहेरी, चिमूर तर तिसर्या माळ्यावर गडचिरोली, ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होईल. फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी मतमोजणी केंद्रावरून तसेच गोंडवाना विद्यापीठ येथून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राहणार असल्याने मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश राहणार नाही. कोटगल चौकापासून बेरीगेट राहणार असून कोटगल चौक मतमोजणी केंद्राबाहेरील प्रवेशद्वार व मुख्यद्वार, अशा तीन ठिकाणी ओळखपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर भ्रमणध्वनी यंत्र (मोबाईल) व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगता येणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रावर धुम्रपानास बंदी राहील. मतमोजणी कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधीच्या वाहनाकरिता पार्कींगची व्यवस्था कारागृहाच्या बाजुला करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिली आहे. मतमोजणी असल्यामुळे कोटगल, इंदाळा, काम्प्लेक्स या भागातील वाहतूक व्यवस्थेतही पोलीस प्रशासनाकडून बदल करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कौन बनेगा खासदार
By admin | Updated: May 15, 2014 23:31 IST