पोलिसांना निवेदन : गावकऱ्यांची घेतली सभाभामरागड : मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मन्नेराजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी, यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मन्नेराजाराम भामनपल्ली रस्ता व पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. यावर तोडगा काढण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने या भागात रस्त्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात येऊन रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक परजने यांनी हे निवेदन स्वीकारले व या प्रश्नाचा भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. पोलीस अधीक्षकांनी दखल घेत मन्नेराजाराम भामनपल्ली परिसरातील नागरिकांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन नागरिकांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मन्नेराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली या गावात सभा घेतल्या व शासनाकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली. निवेदन देताना पोलीस उपनिरिक्षक दळवी, पाटील, बोरसे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मन्नेराजाराम परिसरात रस्ता दुरूस्ती करून बस पाठवा
By admin | Updated: September 21, 2016 02:30 IST