शोधाशोध सुरू : वैनगंगेच्या पुलावर सायकल व चप्पल आढळली देसाईगंज : जुनी वडसा येथील अनिल एकनाथ राऊत (४०) हा इसम बुधवारी रात्री ८.३० वाजता सायकलने घरून निघून गेला. रात्री ११ वाजेपर्यंत तो घरी पोहोचला नाही. त्याची सायकल व चप्पल ब्रह्मपुरी-देसाईगंज मार्गावर वैनगंगा पुलावर दिसून आली. या संदर्भात देसाईगंज पोलिसांनी इसम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. जुनी वडसा येथे साऊंड सिस्टीमचा व्यवसाय करणारा अनिल राऊत हा इसम एप्रिल महिन्यापासून पायाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आर्थिक विवंचनेमुळे त्याची मन:स्थिती ठिक नव्हती. बुधवारी सायकलने रात्री ८.३० वाजता तो निघून गेला. त्यानंतर नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला. आरमोरी वघाळापर्यंत काही मंडळी नदीपात्रात जाऊन आली. परंतु त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या संदर्भात देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना विचारणा केली असता, आम्ही नदी पुलावर जाऊन आलो. नदीवर आम्हाला सायकल व चपला आढळल्या. त्यावरून त्याने नदीत उडी घेतली असेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही घटना बघणारा कुणीही प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे केवळ मिसींगची नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
जुनी वडसा भागातील इसम बेपत्ता
By admin | Updated: August 12, 2016 00:50 IST