गडचिरोली : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचाई उपविभागाच्या कार्यालयातील कक्षाच्या छत मोडकळीस आले आहे. तसेच या कार्यालयातील तांत्रिक विभागाच्या कक्षात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. या कार्यालयाची पूर्णत: दुरवस्था झाली असून याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सदर सिंचाई उपविभाग येथील इंदिरा गांधी चौकातील केवळ चार खोल्यांमध्ये थाटला आहे. या कार्यालयात एकूण १४ कर्मचारी कार्यरत असून तांत्रिक विभागाचे छत दोन महिन्यापूर्वी मोडकळीस आले आहे. या तांत्रिक विभागात दोन उपअभियंते कार्यरत आहे. कक्षाच्या दुरवस्थामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. सदर कक्षाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याकडे दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. मात्र जि.प. बांधकाम विभागाने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर कार्यालय जुन्याच इमारतीत असल्याने इतर कक्ष देखील मोडकळीस आले आहे. जि.प. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कार्यालयाच्या इमारतीची दुरूस्ती करावी, तसेच या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंचाई उपविभागाच्या कार्यालयाची दुरवस्था
By admin | Updated: October 29, 2014 22:49 IST