तेलंगणच्या मुख्य अभियंत्याकडून पाहणी अहेरी-गुडेम दरम्यान बांधकाम सुरू अहेरी : अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीवर अहेरी ते गुडेम दरम्यान तेलंगण राज्याला जोडणाऱ्या पुलााचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती तेलंगण राज्याचे मुख्य अभियंता रवींद्रराव यांनी लोकमतशी बोलताना दिली. अहेरी ते गुडेम दरम्यान प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारतर्फे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. या पुलाचे अंतर एक किमीच्या वर असून जवळपास ६४ कोटी रूपये या कामावर खर्च होणार आहे. कामाचा वेग अतिशय चांगला असून आतापर्यंत २४ पैकी १३ पिल्लरचे काम पूर्ण झाले आहे. उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिल्लर जमिनीच्या खोलपासून वरपर्यंत घेण्यात येत आहे. दोन्ही राज्यांकडून या कामाबाबत सकारात्मक प्रतिसाद असल्याने वेळेच्या आत हे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती त्यांनी तेलंगणा राज्याच्या गुडेम भागात भेट देऊन पुलाची पाहणी केली. यावेळी लोकमतशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासमावेत तेलंगणाचे स्थानिक अधीक्षक अभियंता करीमुद्दीन, कार्यकारी अभियंता व्यंकटी, सुरक्षा अभियंता किशोरकुमार, सहायक अभियंता लक्ष्मीनारायण आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) नक्षलवाद्यांनी केली होती जाळपोळ दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाच्या बांधकाम स्थळावर नक्षलवाद्यांकडून साहित्याची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे हे काम काही काळ बंद पडले होते. या कामाला आता पुन्हा वेग आला असून हा पूल पूर्ण झाल्यास अहेरी व तेलंगणा राज्याचा संपर्क थेट होणार आहे. या भागातून दळणवळण वाढीलाही चालना मिळेल.
आंतरराज्यीय पूल वर्षभरात पूर्ण होणार
By admin | Updated: January 18, 2017 01:38 IST