चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
गाेकुलनगर रस्त्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्याची नगर परिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणच्या नाल्या तुडुंब आहेत.
मुरूमगाव येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. मुरूमगाव परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. मुरूमगाव हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विजेची बचत करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
शौचालयांची स्वच्छता करा
देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अहेरीत कुशल मजुरांचा तुटवडा
अहेरी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.
पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
विनापरवानगीने घरांचे बांधकाम
आरमाेरी : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दरवर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
अहेरी : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते. त्यामुळे हस्तलिखित सातबारा पुरवावा, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक
गडचिरोली : बालरुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला लागून दुकाने थाटण्यात आली आहेत. बालक पळवून नेण्यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. अतिक्रमणामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणे गरजेचे आहे.