गडचिरोली : ३०५४ योजनेच्या निधीतून मार्ग व पूल याचे बांधकाम काटली ते कोंढाळा या पोचमार्गावर करण्यात आले. १.२० किमी खडीकरणाचा हा रस्ता अवघ्या एक महिन्यात पूर्णत: उखडला आहे. या कामावर १५ ते २० लाख रूपयाचा खर्च करण्यात आला. या रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विश्वास भोवते यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग १ यांच्याकडे केली आहे. मे, जून महिन्यात सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. या कामाचा कंत्राटदार कोण? तसेच बांधकाम विभागाच्या कोणत्या कार्यालयाने हे काम केले, यावर किती निधी खर्च झाला. याची माहितीही फलकाद्वारे देण्यात आलेली नाही. साईडबम्ब रोड तयार केल्यानंतर दोनही बाजुला मुरूम टाकून तयार केले जातात. तेही येथे तयार करण्यात आलेले नाही. या कामाची संपूर्ण जबाबदारी अभियंत्यावर निश्चित करून त्यांच्याकडून याची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही भोवते यांनी केली आहे. या निकृष्ठ कामाला शाखा अभियंता व कंत्राटदार दोषी आहेत, असेही भोवते यांनी तक्रारीत म्हटले आहे. सदर रस्ता हा मुख्यमार्गावरचा असल्याने येथून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काटली ते कोंढाळा रस्ता कामाची चौकशी करा
By admin | Updated: August 13, 2014 23:51 IST