२१५ बसफेऱ्या प्रभावित : गडचिरोली, अहेरी आगारात कडकडीत बंद; १३ लाख रुपयांचा फटकागडचिरोली : महाराष्ट्र राज्य एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. गडचिरोली व अहेरी आगाराचे शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने पहाटेपासूनच राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा ठप्प झाली होती. गडचिरोली आगारातून गुरूवारी १२५ तर अहेरी आगारातून ९० बसफेऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या. ब्रह्मपुरी आगाराच्या अहेरी येथे आलेल्या बसवर संतप्त आंदोलकांनी दगडफेक केल्याने एका बसच्या मागील बाजूची काच फुटल्याची घटना घडली. या संपामुळे गडचिरोली एसटी विभागाला १३ लाख रूपयांचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना घेऊन इंटक या संघटनेच्या वतीने राज्यव्यापी संपाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची २५ टक्के पगारवाढ करावी, या प्रमुख मागणीसह वेतनश्रेणीतील तफावतीबाबतही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप आयोजित करण्यात आला होता. या संपाला गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला.अहेरी येथे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेहबूब अली यांच्या नेतृत्वात पहाटे ५ वाजतापासून आंदोलनाला सुरूवात झाली. त्यामुळे आगारातून एकही बस फेरी सुटली नाही. अहेरी आगाराच्या ९० बसफेऱ्या गुरूवारी बंद राहिल्या. अनेक कर्मचाऱ्यांनी रात्रभर थंडीत जागून पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. त्यामुळे चिमूर, नागपूर आगारातून आलेल्याही बसफेऱ्या अहेरी येथून जाऊ शकल्या नाही. अहेरी आगारातून भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा सारख्या दुर्गम भागातही बसेस आज सोडण्यात आल्या नाही. सकाळपासूनच प्रवासी बस स्थानकावर आले होते. मात्र बससेवा बंद असल्याने त्यांना परत जावे लागले. विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व प्रवाशांचे या आंदोलनामुळे बेहाल झाले. दरम्यान अहेरी आगारासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलनही केले. याचवेळी ब्रह्मपुरी आगारातून अहेरी येथे आलेली एमएच ४० एक्यू ६०४४ क्रमांकाची बस बसस्थानकात न येता बाहेरूनच परत जात असताना संतप्त झालेल्या आंदोलकांनी मुख्य चौकात बसगाडी थांबवून टायरमधील चाकाची हवा सोडली व बसच्या मागील काचावर दगडफेक केली. त्यामुळे मुख्य मार्गावरही बराच काळ तणाव निर्माण झाला होता.गडचिरोली एसटी आगारात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात सकाळी ५ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. यावेळी हसनअली गिलानी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, नरेंद्र भरडकर, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, नंदू वाईलक, प्रतिभा जुमनाके, मनिष ब्राह्मणवाडे, नितेश राठोड, रजनिकांत मोटघरे आदींच्या नेतृत्वात एसटी आगाराचे कर्मचारी सहभागी झाले होते.गडचिरोली आगारात आंदोलनादरम्यान एसडीपीओ डॉ. सागर कवडे व ठाणेदार विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अहेरी येथेही मोठा बंदोबस्त या आंदोलनादरम्यान होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अहेरीत एसटी बस फोडली
By admin | Updated: December 18, 2015 01:41 IST